शहर

उमरखेड डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; तलवारीसह तरुण जेरबंद

ढाणकी पुलाखाली सापळा रचून कारवाई; धारदार २८ इंची तलवार जप्त, गुन्हा दाखल

उमरखेड | प्रतिनिधी

उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने धडाकेबाज कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरात घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दि. १ जुलै २०२६ रोजी रात्री डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांचे पथक रात्रगस्त करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, शेख जिब्राल शेख रहीम (वय २४, रा. आयबाब कॉलनी, उमरखेड) हा ढाणकी रोडवरील पुलाखाली धारदार लोखंडी तलवार घेऊन फिरत आहे.

पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार डी.बी. पथकाने पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. रात्री सुमारे ११ वाजता संशयितास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून २८ इंच लांबीची व १.५ इंच रुंदीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. जप्त शस्त्राची अंदाजे किंमत ₹५०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५९२/२०२६ नोंदवून भारतीय हत्यार कायद्यानुसार (Arms Act) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणी अवैधरित्या घातक शस्त्रे, अग्निशस्त्रे किंवा इतर बेकायदेशीर कृत्ये करत असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ उमरखेड पोलीस स्टेशनला द्यावी.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button