महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, नर्सवर हल्ला; उमरखेडमध्ये तीव्र निषेध

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव येथील ग्रामीण रुग्णालयात १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता १० ते १२ अज्ञात व्यक्तींनी धिंगाणा घालत डॉक्टर व नर्ससह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. यावेळी रुग्णालयातील काचा फोडण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोरांच्या भीतीने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लपून बसण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले.
या घटनेचे पडसाद उंबरखेड येथेही उमटले. उंबरखेड येथील डॉक्टर व नर्स यांनी घटनेचा तीव्र निषेध करत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, रुग्णालयात दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, महागाव शहरातील सर्व खासगी डॉक्टरांच्या युनियननेही ग्रामीण रुग्णालयातील घटनेचा निषेध केला. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार वानखडे यांना निवेदन देऊन आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
रात्रीच्या वेळी नशेत असलेले व गुंड प्रवृत्तीचे काही लोक परिसरात वावरत असून, त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. अशा व्यक्तींवर वेळीच कारवाई करून डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणी ठाणेदार वानखडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “रुग्णालयात डॉक्टरांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. लवकरच आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने या घटनेबाबत प्रशासन व पोलिसांनी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.



