अखेर कोदंरी येथील पांदण रस्ता खुला करण्याचे तहसीलदारांचे आदेश

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मौजा कोदंरी येथील पांदण रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याचे आदेश महागावचे तहसीलदार अभय मस्के यांनी दिले आहेत.
याबाबत शेतकरी प्रेमसिंग बाला राठोड व भिकम बाला राठोड यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, सुमारे ४० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या पांदण रस्त्यावर नांगरणी करून बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करण्यात आले व त्यामुळे शेतकऱ्यांचा ये-जा करण्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
तक्रारीची दखल घेत तहसीलदार अभय मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा अहवाल तसेच गैरअर्जदारांचा लेखी जबाब विचारात घेऊन तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम १४३ अन्वये आदेश पारित केला. या आदेशानुसार, सर्वे क्रमांक १८ जवळील पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यात यावा तसेच भविष्यात कोणत्याही व्यक्तीने या रस्त्यावर अडथळा निर्माण करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच संबंधित अर्जदारांनी या रस्त्याने ये-जा करताना इतरांच्या शेतातील पिकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदारांच्या या निर्णयामुळे तक्रारदार शेतकरी प्रेमसिंग बाला राठोड व भिकम बाला राठोड यांनी समाधान व्यक्त केले आहे लवकरच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने मधून खडीकरण केल्या जाईल असे आश्वासन दिले.



