अखेर पाठपुराव्याला यश; पुसद–काळी पोखरी–यवतमाळ बससेवा पुन्हा सुरू

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे :
पुसद ते काळी पोखरी मार्गे यवतमाळ जाणारी बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून, यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोहरादेवी ते दहीसावळी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ही बससेवा मागील एक वर्षापासून बंद होती. परिणामी, काळी सर्कलमधील रुग्ण, विद्यार्थी तसेच गोरगरीब नागरिकांना यवतमाळ येथे ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन काळी सर्कलमधील सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबुलाल राठोड, वसंतराव पवार व सैय्यद बेग पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री Indranil Naik यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
अखेर या पाठपुराव्याला यश येत आजपासून बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, विशेषतः रुग्ण व विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.



