Uncategorized

जिल्हा बँक निवडणुकीत ‘सूचक-अनुमोदक’ही भाव खाऊ लागले! २८ सोसायटी प्रतिनिधींची दुहेरी भूमिका; उमेदवारांसमोर नामांकनासाठी नवी कसरत (भाग १०)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे :
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुका गटातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तालुका गटातील २८ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी एका संचालकाची निवड करणार असून, या प्रतिनिधींचे महत्त्व मतदानापुरतेच मर्यादित राहिलेले नसून सूचक आणि अनुमोदक म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सूचक व अनुमोदक आवश्यक असल्याने संभाव्य उमेदवारांकडून या प्रतिनिधींचा शोध सुरू आहे. मात्र, एखाद्या उमेदवाराच्या अर्जावर सूचक किंवा अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यास संबंधित प्रतिनिधीची त्या उमेदवाराशी राजकीय जवळीक असल्याचा संदेश मतदारसंघात जाऊ शकतो. परिणामी पुढील राजकीय समीकरणांमध्ये त्या प्रतिनिधीला इतर उमेदवारांकडून दूर केले जाण्याची शक्यता असल्याने अनेक प्रतिनिधीही आता सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
‘शिक्का’ बसण्याची भीती
एखाद्या उमेदवाराला सूचक अथवा अनुमोदक राहिल्यानंतर त्या उमेदवाराचा ‘शिक्का’ संबंधित प्रतिनिधीवर बसतो, अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांशी संबंध कायम ठेवू इच्छिणारे काही प्रतिनिधी नामांकन प्रक्रियेत कोणाची बाजू घ्यायची, याबाबत सावधपणे निर्णय घेत आहेत.
यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुक असलेल्या काही संभाव्य उमेदवारांसमोर सूचक-अनुमोदक मिळविण्याचेही आव्हान निर्माण झाले आहे.
प्रमुख संभाव्य उमेदवारांच्या गोटातही हालचाली
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवार शिवाजी देशमुख सावनेर, प्रा. शिवाजी बळीराम राठोड आणि नितीन भुतडा यांच्या समर्थक मतदार प्रतिनिधींच्या हालचालींकडे लक्ष लागले आहे. प्रत्येक संभाव्य उमेदवाराच्या संपर्कात त्यांना मानणारे किंवा त्यांच्या विचारधारेशी संबंधित काही प्रतिनिधी असल्याची चर्चा आहे.
मात्र, अंतिम उमेदवारी आणि राजकीय समीकरणे स्पष्ट होण्यापूर्वी कोणता प्रतिनिधी कोणाच्या बाजूने उभा राहतो, याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकीकडे २८ प्रतिनिधींच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून असताना, दुसरीकडे उमेदवारी अर्जासाठी लागणारे सूचक-अनुमोदकही महत्त्वाचे ठरले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या आधीच ‘सूचक-अनुमोदकांचा भाव’ वाढल्याची चर्चा महागाव तालुक्यात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button