SIR अभियानाच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांची शिरपूर ग्रामपंचायतीला भेट

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महागाव तालुक्यातील गुंज मंडळातील शिरपूर ग्रामपंचायतीला भेट देऊन अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मतदार पडताळणी, ई-फॉर्म भरणे, नवमतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती व इतर आवश्यक प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी विशेष दक्षता घेण्याबरोबरच कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आवश्यक फॉर्म भरून घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, महागावचे तहसीलदार अभय मस्के, गुंज मंडळ अधिकारी, शिरपूरचे तलाठी, बीएलओ तसेच निवडणूक यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना SIR अभियानाच्या प्रगतीची माहिती सादर केली. अभियान शासनाच्या सूचनांनुसार प्रभावीपणे राबवून मतदार नोंदणीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.



