शहर

महागाव बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव बसस्थानकासमोर मागील दोन ते तीन वर्षांपासून अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला होता. बसस्थानकाच्या परिसरात खासगी वाहनांद्वारे प्रवाशांची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि शासकीय वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांच्या निर्देशानुसार तसेच विभागीय नियंत्रक कचवे व आगार व्यवस्थापक किनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाहतूक नियंत्रण अधिकारी पारवेकर यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे. बसस्थानक परिसरात अवैध वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. तसेच बसस्थानकासमोर अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची नागरिकांची तक्रार होती.
दरम्यान, महागाव शहरात स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती नसल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महागाव पोलीस ठाण्यात सध्या वाहतूक शाखेचा स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध नसल्याची परिस्थिती असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. वाढती वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक आणि अपघातांच्या घटना लक्षात घेता महागाव येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button