उमरखेड तालुक्यात बेकायदा रेती-मुरूम तस्करी राजरोस पोलिस व महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून धंदा सुरू !

मुख्य संपादक
उमरखेड तालुक्यात बेकायदा रेती व मुरूम तस्करीने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पोलिस व महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून तस्कर खुलेआम आपला काळाबाजार चालवत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. तालुक्यातील मारलेगाव, निमगव्हाण, संगम चिंचोली, चालगणी, 5 कारखेड, हातला, साखरा, डिगडी, बेलखेड, चातारी, बोरी आदी गावांच्या नदीकाठावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू आहे.
रात्रीच्या अंधारात चोरट्या मार्गाने टिप्पर व डुगे भरून रेती-मुरूम उमरखेड शहरात आणली जाते आणि ती अव्वाच्या सव्वा दराने राजरोस विकली जाते. शहरातील नागरिकांची खुलेआम लूट सुरू असताना, महसूल व पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संतापजनक आरोप जनतेतून होत आहे. विशेष म्हणजे, बनचिंचोली परिसरातील एक कुख्यात रेती तस्कर रात्रंदिवस टिप्पर भरून शहरात बेकायदा विक्री करत असून, प्रशासनाला हाताशी धरून निर्वावलेपणाने धंदा चालवत असल्याची चर्चा उघडपणे होत आहे. “कायद्याचे राज्य आहे की तस्करांचे?” असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. या बेकायदा उत्खननामुळे नदीपात्रांचे पर्यावरणीय नुकसान, शेतीची धूप, पाणीटंचाईचा धोका आणि अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही प्रशासनाची संशयास्पद शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. प्रशासन अकार्यक्षम आहे की संगनमतात सहभागी? असा रोखठोक सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. शहर व तालुक्यातील नागरिकांनी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कर्डिले, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उमरखेड यांना थेट मागणी केली आहे की, बेकायदा रेती-मुरूम तस्करी करणाऱ्या टिप्पर व डुगे मालकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, वाहन जप्ती, गुन्हे दाखल करून तस्करांना कायद्याने वठणीवर आणावे. रेती माफियांना अभय नाही, कायद्याचा धाक हवा! उमरखेडमध्ये “माफियाराज” चालणार नाही! प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई न केल्यास हा प्रश्न केवळ तस्करीपुरता मर्यादित न राहता लोकआंदोलनाचे रूप धारण करेल असे तालुक्याचे चित्र आहे.



