पुसद उपविभागात हरविलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत ३१ मोबाईल फोन हस्तांतरित; पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी पुसद |

प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद उपविभागातील नागरिकांचे हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून काढत पुसद पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने मोबाईल शोध मोहीम राबवून एकूण ३१ मोबाईल फोन मूळ मालकांना परत करण्यात आले.
पुसद शहर, वसंतनगर, पुसद ग्रामीण व खंडाळा या परिसरातील नागरिकांचे मोबाईल फोन हरविल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे CIER Portal या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला.
या कारवाईत
पुसद शहर पोलीस ठाणे – १८ मोबाईल,
पुसद ग्रामीण पोलीस ठाणे – ०७ मोबाईल,
वसंतनगर पोलीस ठाणे – ०१ मोबाईल,
खंडाळा पोलीस ठाणे – ०५ मोबाईल,
असे एकूण **३१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
सदर मोबाईल फोन सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून शोधण्यात आले असून, कार्यक्रमाद्वारे मोबाईलचे मूळ मालकांना हस्तांतर करण्यात आले.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांचे मोबाईल फोन हरविले किंवा चोरीस गेले असतील, त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, जेणेकरून CIER Portal च्या माध्यमातून मोबाईल शोधण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.
पुसद पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



