Uncategorized

अवैध रेती माफियांवर SDO सक्रीय; तीन टिप्पर जप्त, महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड, दि. 17 जून 2026 : यवतमाळ जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती तस्करीचा सुळसुळाट सुरू असताना प्रशासनातील काही यंत्रणा अद्यापही निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत उपविभागीय अधिकारी श्री. सखाराम मुळे यांनी स्वतः पुढाकार घेत अवैध रेती माफियांविरोधात धडक मोहीम राबवत तीन टिप्पर जप्त करून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

महागाव तालुक्यातील मुडाणा, महागाव व फुलसावंगी परिसरात दिनांक 17 जून 2026 रोजी रात्री 9:30 ते 10:20 या वेळेत अचानक छापेमारी करण्यात आली. या कारवाईत विनापरवाना रेती वाहतूक करणारे MH40CD3890, JH02AD5680 व JH02AD8160 क्रमांकाचे तीन टिप्पर पकडण्यात आले. प्रत्येक वाहनात अंदाजे दोन ब्रास रेती आढळून आली. संबंधित वाहने जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय उमरखेड येथे जमा करण्यात आली आहेत.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी श्री. सखाराम मुळे, मंडळ अधिकारी गजानन सुरोशे (बिटरगाव), मंडळ अधिकारी मारुती एकुलवार (महागाव), महसूल सहाय्यक अक्षय बोनगुलवार आणि शिपाई मिलिंद पानपट्टी यांच्या पथकाने केली.

अवैध उत्खननाविरोधात प्रशासनाची मोहीम की एकट्या अधिकाऱ्याची लढाई?

उमरखेड, महागाव आणि परिसरात अनेक महिन्यांपासून अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. रात्रीच्या अंधारात नदीपात्रांची लूट सुरू असताना संबंधित यंत्रणांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महसूल विभागाच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांवरच कारवाईची जबाबदारी पडल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, “रेती माफियांना रोखण्यासाठी श्री. सखाराम मुळे हेच एकटे अधिकारी मैदानात उतरून जीवाची पर्वा न करता कारवाई करत आहेत.” मात्र अवैध गौण खनिज उत्खननावर कायमस्वरूपी लगाम घालण्यासाठी पोलीस, महसूल, खनिकर्म व इतर यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

कायदा काय सांगतो?

विनापरवाना रेती उत्खनन व वाहतूक करणे हे गौण खनिज नियमांचे उल्लंघन असून संबंधितांवर दंड, वाहन जप्ती तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते. शासनाला महसुली तोटा पोहोचविणे आणि पर्यावरणाची हानी करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

नागरिकांचा सवाल

“जर एका उपविभागीय अधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी धाड टाकून तीन टिप्पर पकडू शकतात, तर संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली तर रेती माफियांचे जाळे किती मोठ्या प्रमाणात उघड होईल?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधातील ही कारवाई कौतुकास्पद असली तरी संपूर्ण जिल्हाभर सुरू असलेल्या रेती माफियांच्या कारवायांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक व्यापक आणि कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button