महाविकास आघाडीच्या नावावर मते मागून मतदारांशी गद्दारी का?; खासदार आष्टीकरांच्या भूमिकेवर हिमायतनगरच्या जनतेतून तीव्र संताप

- हिमायतनगर ,( तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम )
हिमायतनगर:हिंगोली लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने हिमायतनगर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील हजारो मतदारांनी महाविकास आघाडी म्हणून निष्ठा आणि विश्रासाच्या जोरावर आष्टीकरांना भरघोस मतदान केले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी सत्ताधाऱ्यांशी घरोबा करण्याचे संकेत दिल्याने, “आमच्या मतांशी आणि विश्वासाशी ही उघड प्रतारणा आहे,” अशी तीव्र भावना हिमायतनगरच्या चौकाचौकातून व्यक्त होत आहे.
लोकांचा थेट सवाल: मते आघाडीची, मग सत्ता आणि निष्ठा शिंदेंची का?
हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील मतदारांमध्ये सध्या खासदार आष्टीकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षातच असल्याचा दावा केला असला, तरी त्यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत होणाऱ्या हालचालींमुळे मतदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. केवळ पक्षांतर नव्हे, तर मतदारांनी दिलेल्या कौलाचा हा घोर अपमान असल्याची भावना येथील जनता बोलून दाखवत आहे. “जर पक्षांतर करायचेच होते, तर आघाडीच्या नावाने आणि आमच्या हक्ताच्या मतांवर खासदार का झालात?” असा थेट सवाल हिमायतनगरचा सामान्य मतदार करत आहे.
स्वतःच्या विकासासाठी पक्षांतर; जनतेला फक्त खोटी आश्वासने!
हिमायतनगरमधील सुजाण नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये सध्या आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. “हे नेते केवळ स्वतःच्या राजकीय आणि वैयक्तिक स्वास्थ्यासाठी व विकासासाठी सत्ताधारी गटात जात आहेत. शहर किंवा गावाच्या विकासाशी यांना काहीही देणेघेणे नाही,” असा थेट आरोप येथील जनता करत आहे. निवडणुकीच्या काळात मतदारसंघाचा कायापालट करू, असे मोठमोठे दावे करणाऱ्या या नेत्यांनी केवळ मतदारांना खोटी आश्वासने देऊन स्वतःची खुर्ची उबवल्याची भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. नेत्यांच्या अशा स्वार्थी भूमिकेमुळे सामान्य जनतेमध्ये कमालीची निराशा पसरली आहे.
एकाच घरात दोन आघाड्या; ‘बाप शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात’ यावर जनतेचा आक्षेप
या राजकीय भूकंपाचे सर्वात मोठे पडसाद नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीवर पडताना दिसत आहेत. एकीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटाच्या उंबरठ्यावर असताना, दुसरीकडे त्यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे अजूनही महाविकास आघाडीचे (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार म्हणून मते मागत आहेत. घराण्यातच अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या आघाड्या ठेवून मतदारांना आणि लोकप्रतिनिधींना मूर्ख बनवण्याचा हा प्रकार सुरू असल्याची चर्चा हिमायतनगरमध्ये आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एकाच वेळी दोन्ही बाजू सांभाळण्याचा हा प्रयत्न मतदारांच्या पचनी पडत नसून, याचा थेट फटका त्यांच्या मुलाच्या निवडणुकीला बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आणि भविष्यातील राजकीय परिणाम
ज्या विरोधकांच्या आणि विचारसरणीच्या विरोधात हिमायतनगरमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करून आष्टीकरांना निवडून आणले, आज त्याच सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याच्या आष्टीकरांच्या हालचालींमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आष्टीकरांवर पक्षफोडीचे ‘व्हाइस कॅप्टन’ असल्याचा थेट आरोप केल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. या विश्वासघातामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत हिमायतनगरची जनता अशा पक्षांतरी नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणार, असा सूर सध्या संपूर्ण तालुक्यातून उमटत आहे.



