युरिया जादा दराने विक्री; सलीम कृषी केंद्राचा परवाना निलंबित जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा २ फेब्रुवारी रोजी आदेश

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथील सलीम कृषी केंद्र यांनी शेतकऱ्यांना युरिया खत जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने, संबंधित कृषी केंद्राचा परवाना १९८५ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार निलंबित करण्यात आला आहे.
सलीम कृषी केंद्राचे प्रोप्रायटर हनीफ अब्दुल गफार दोसानी यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली असून, जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत आदेश पारित केला आहे.
यापूर्वी महागावचे कृषी अधिकारी चेके साहेब यांनी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी तपासणी अहवाल जिल्हा कृषी कार्यालयाकडे सादर केला होता. त्या अहवालाच्या आधारेच सदर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या कारवाईमुळे परिसरातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले असून, शेतकऱ्यांकडून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. खतांची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही कारवाई इतर व्यापाऱ्यांसाठी इशारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.



