Uncategorized

महागाव तालुक्यातील पावसाच्या नुकसानीचा चुकीचा अहवाल रद्द करा; नव्याने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील तिवरंग, पोहंडूळ तसेच इतर बहुतांश गावांमध्ये ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी न करता कृषी व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसान झाले नसल्याचा (निरंक) अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हा चुकीचा अहवाल तात्काळ रद्द करून बाधित क्षेत्राची नव्याने प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही अशाच चुकीच्या अहवालांमुळे महागाव तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले होते. नदीकाठच्या भागातील अनेक शेतजमिनी वाहून गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले, तरीही वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यासोबतच लोकप्रतिनिधींनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, जनता दरबार आयोजित करून शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यांचे निराकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करून लोकप्रतिनिधींना जाब विचारतील, असा इशाराही शेतकरी व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button