जवळगावकरांच्या भूमिकेसोबत आम्ही ठाम; समद खान यांच्या वक्तव्यानंतर मतदारांमध्ये संभ्रम, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): नांदेड जिल्ह्यातील ‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वी मोहिमेनंतर आता हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात ‘ऑपरेशन लोटस’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेविका प्रतिनिधी समद खान यांनी नुकत्याच झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या राजकीय भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला. “साहेब तुम्ही ज्या पक्षात जाल, आम्ही आणि तुमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत,” असे समद खान म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “जरी विधानसभा निवडणुकीला अजून ३ ते ४ वर्षे बाकी असली, तरी यात फक्त कार्यकर्त्यांचीच राय घेणे महत्त्वाचे आहे.” त्यांच्या या विधानामुळे जवळगावकर व त्यांच्या समर्थकांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा आता आणखी गतिमान झाली आहे.
शनिवारी जवळगाव येथे पार पडलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असा एकमुखी आग्रह धरला. खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात मोठे बदल घडले असून, आता जवळगावकरही सत्ताधाऱ्यांच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मतदारांचा संताप आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा
मात्र, समद खान यांच्या या भूमिकेनंतर आणि जवळगावकरांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या संकेतांमुळे हिमायतनगरच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः वॉर्ड क्रमांक १६ मधील मतदारांमध्ये तीव्र संभ्रम आणि उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. आमदारकीच्या निवडणुकीला अजून तब्बल ३ .४ वर्षे बाकी असताना आतापासूनच भाजपचे संकेत दिले जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
बैठकीत “साहेब तुम्ही जिथे जाल, तिथे कार्यकर्ते तुमच्या सोबत येतील” असा दावा केला गेला असला, तरी सामान्य जनतेमधून यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. “फक्त मोजक्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन किंवा त्यांची राय विचारून जनता साथ देत नसते; कारण शेवटी मतदान जनता करते, कार्यकर्ते नाही,” असा रोकडा सवाल मतदार करत आहेत.
नगरपंचायत निवडणुकीत एकतर्फी मतदान करून मोठा विजय मिळवून देणाऱ्या मतदारांना व स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा पक्षांतराचा घाट घातला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जनता फक्त मतदानापुरतीच मर्यादित आहे का? की नगरसेवक आणि राजकीय नेते स्वतःच्या सोयीनुसार निर्णय घेणार?” असा थेट सवाल मतदार विचारत आहेत.
सोशल मीडियावरही या संभाव्य राजकीय भूकंपावर तर्क-वितर्कांना उधाण आले असून नागरिकांमध्ये याची जोरात चर्चा रंगली आहे. या बैठकीचा आणि समद खान यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हदगाव आणि हिमायतनगर येथील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरवणार असल्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्पष्ट केले असून, येत्या २६ जून रोजी होणाऱ्या विस्तृत बैठकीत ते आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. स्थानिक पातळीवरील हा बदल आगामी काळात कोणती नवी समीकरणे तयार करतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



