शहर

रेतीसाठा प्रकरण झाकण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील अवैध रेती उपसा व साठवणूक प्रकरणावरून वातावरण तापले असून, रेतीसाठ्यांविरोधात आवाज उठवणारे शेतकरी प्रदीप जगताप पाटील यांच्यावर उपोषण दडपण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे करण्यात आली आहे.
भोसा येथील शेतकरी प्रदीप जगताप पाटील यांनी सुमारे नऊ महिन्यांपूर्वी महागाव परिसरातील अवैध रेतीसाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी १७ जून २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
तक्रारीनुसार, उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा गुन्हा काही वेळातच मागे घेण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीची कारवाई ही आकसापोटी व संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महागाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीसाठे असूनही महसूल विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली गौण खनिज वाहने, वसूल झालेला दंड व थकीत महसूल यांची स्वतंत्र चौकशी झाल्यास मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश होऊ शकतो, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, महागावचे तहसीलदार अभय मस्के यांच्याविरोधातही विविध आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची तसेच कथित आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यकारी पदावरून दूर करण्याची मागणी समितीने केली आहे.
या तक्रारीमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, विभागीय आयुक्त या प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
“प्रशासनाने रेती माफियांचे हित जपण्यासाठी एका प्रामाणिक शेतकऱ्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. विभागीय आयुक्तांनी तात्काळ निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
– जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष, जन आंदोलन आधार संघर्ष समिती यांनी भ्रष्टाचार अधिकारी अभय मस्के यांच्याविरोधात लेखी तक्रार अप्पर आयुक्त अमरावती यांना दिली आहे तसेच चौकशी होईपर्यंत शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button