Uncategorized

चक्रीवादळाच्या तडाख्याने शिरपूर परिसरातील केळी पीक उद्ध्वस्त; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात २६ मे २०२६ रोजी आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरपूर येथील शेतकरी अरुण पाटील यांची हाताशी आलेली तब्बल ८००० केळीची झाडे अक्षरशः उन्मळून पडली असून संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. तसेच उपसरपंच बालाजी बोखारे यांचे ३००० केळीची झाडे तर संजीव पाटील व महेश पाटील यांचे सुमारे ५००० केळीची झाडे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.


चक्रीवादळाच्या जोरदार वाऱ्यामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्या असून अनेक ठिकाणी झाडे उखडून फेकल्यासारखी पडलेली दिसून आली. याशिवाय शेतीतील सोलर पॅनलचेही मोठे नुकसान झाले आहे. काही वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिरपूर गावात चक्रीवादळाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. गावातील वीज वाहिन्यांचे पोल कोसळल्याने संपूर्ण गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे हाताशी आलेले केळीचे पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केळीची लागवड केली होती. मात्र चक्रीवादळाच्या तडाख्यात सर्व मेहनत वाया गेली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button