महागाव तालुक्यात ‘जलजीवन मिशन’ योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; गावांमध्ये अद्याप पाण्यासाठी महिलांची वणवण

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नळ’ योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचावे यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही अनेक गावांमध्ये आजही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील कारंजखेड, पोहंडूळ, कासाळबेळ, मोहदी, कासोळा, फुलसागवी, वडद, काळी दौलत तसेच इतर काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजना कागदावरच पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच माळ पठाराव प्रत्यक्षात मात्र गावांमध्ये पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन किंवा घराघरात नळजोडणीचे काम अपूर्ण किंवा अस्तित्वात नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
या परिस्थितीमुळे गावातील महिलांना आजही विहिरी, ओढे किंवा दोहांमधून पाणी भरून आणावे लागत असून मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शासनाच्या ‘हर घर नळ’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करणे हा असताना महागाव तालुक्यात मात्र ही योजना नावालाच राहिल्याची चर्चा होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या कामांमध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी बोगस पाण्याच्या टाक्या दाखवून किंवा काम पूर्ण न करता बिले काढण्यात आल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.
या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महागाव तालुक्यातील प्रत्येक गावात जलजीवन मिशनची ‘हर घर नळ’ योजना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शासनाने या योजनेसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असताना तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम का आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



