Uncategorized

धनोडा बंधाऱ्यामुळे १३०० हेक्टर शेती सिंचनाखाली; महागाव-माहूर परिसराच्या विकासाला चालना


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव व माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जाणारा धनोडा येथील पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधारा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पामुळे तब्बल १३०० हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
महागाव तालुक्यासह माहूर तालुक्यातील अनेक गावांना या प्रकल्पाचा थेट लाभ मिळणार आहे. विशेषतः अतिदुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर परिसरातील शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
धनोडा बंधाऱ्याची एकूण पाणी साठवण क्षमता मोठी असून त्यातील बहुतांश पाणी सिंचनासाठी वापरले जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे केवळ खरीप हंगामावर अवलंबून राहण्याऐवजी रब्बी व उन्हाळी पिकांचे उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सिंचनाच्या सुविधेमुळे कापूस, सोयाबीन, हरभरा यांसारख्या पारंपरिक पिकांबरोबरच भाजीपाला, फळबागा आणि इतर नगदी पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. परिणामी कृषी उत्पादन वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार असून शेतकरी कुटुंबांच्या जीवनमानात सुधारणा अपेक्षित आहे.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर महागाव आणि माहूर तालुक्याच्या कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, धनोडा बंधारा हा परिसराच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे धनोडा अनंतवाडी धार सेवा नगर कासारवेळ वरुडी येथे पाण्याची पातळी वाढणार त्यामुळे शेतकऱ्यांना या परिसरात बराचसा फायदा शेती करता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button