ग्रामपंचायतीत १३ लाखांचा घोटाळा? सचिव-सर्पंचांसह अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील धनमुख ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अर्जदार श्री. राम उत्तम जाधव यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, १५ व्या वित्त आयोगांतर्गत गावातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र संबंधित तलाठी सचिव, सरपंच, कार्यरत सचिव, कनिष्ठ अभियंता व इतरांनी संगनमत करून प्रत्यक्षात कामे न करता कागदोपत्री कामे दाखवून शासनाची व ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुमारे ₹१३,३६,९६९ (तेरा लाख छत्तीस हजार नऊशे एकोणसत्तर रुपये) इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तक्रारीत संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, वेळेत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही अर्जदाराने दिला आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे पंचायत समिती प्रशासनावरही दबाव वाढला असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



