Uncategorized

पटवारी–मंडल अधिकारी संपाचा फायदा; वेणी परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वेणी परिसरात अवैध मुरूम उत्खनन खुलेआम सुरू असून, महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच हा गैरव्यवहार फोफावत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. टेकड्या व डोंगर अक्षरशः खोदून भुईसपाट करण्याचा सपाटा सुरू असतानाही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या पटवारी व मंडल अधिकारी बेमुदत संपावर असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत मुरूम माफियांनी दिवसाढवळ्या उत्खनन सुरू केले असून प्रशासनाचे संरक्षण असल्याशिवाय इतका मोठा प्रकार शक्य नाही, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
विश्वसनीय माहितीनुसार, वेणी येथील दत्त मंदिर परिसरातील संपूर्ण टेकडी अवैधरीत्या मुरूम काढून अक्षरशः सपाट करण्यात आली आहे. धार्मिक स्थळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन करून पर्यावरणाचे गंभीर नुकसान करण्यात आले असून महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय अधिक बळावला आहे.
या अवैध उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक टेकड्या नष्ट होत असून पावसाळ्यात माती धूप, भूजल पातळीवर परिणाम आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून शेतजमिनींनाही मोठा फटका बसत आहे.
अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत व नुकसानभरपाई वसूल करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून हा विषय सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button