मोरत ते धारमोहा मार्गाची दुरवस्था; संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन, लोकप्रतिनिधींना जाग येणार का?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
सततच्या मुसळधार पावसामुळे मोरत ते धारमोहा हा रस्ता पूर्णतः खराब झाला असून नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी ग्रामस्थांनी आमदार आणि खासदारांनी तातडीने या रस्त्याकडे लक्ष देऊन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली. मात्र, महागाव मतदारसंघात खासदार जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिसून येत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
जनतेची व्यथा आणि हाक आता वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असून नाईलाजाने नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. आपल्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आंदोलनाचे छायाचित्र काढून वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी द्यावी लागत असल्याची खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अशा परिस्थितीत तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



