महागाव तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप; पंचनामे नसतील तर नुकसानभरपाई कधी मिळणार?

महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सवना येथील एका शेतकऱ्याची सुमारे तीन एकर केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर शिरपूर येथील तब्बल १५ एकर केळीचे मोठे नुकसान झाले. संबंधित ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली, छायाचित्रेही घेतली. आमदार किसन वानखडे यांनीही नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. मात्र, आजपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना एक रुपयाचीही नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, काही वृत्तांमध्ये महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यांत शेतीचे नुकसान ‘शून्य टक्के’ असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्याने महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असताना असा अहवाल कसा पाठविण्यात आला, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर वेळेत पंचनामेच होत नसतील, तर नुकसानभरपाई मिळणार कधी? केवळ पाहणी करून किंवा छायाचित्रे काढून प्रश्न सुटत नाही. शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल पाठवून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी असा आरोपही केला आहे की, लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असली तरी त्यानंतर पाठपुरावा प्रभावीपणे होत नसल्याने प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अनेकांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत असून, तातडीने नव्याने पंचनामे करून योग्य अहवाल सादर करावा व पात्र शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.



