बंदी भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप सोनदाभी–बोरी मार्ग जीवघेणा; निकृष्ट कामांवर कारवाईची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सोनदाभी ते बोरी (वन) मार्गाने प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. देशाने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून २०४७ पर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले असताना, बंदी भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे.
सन २०२५ मध्ये बोरी ते सोनदाभी दरम्यान खडीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता पुन्हा खराब झाला आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
वनविभागाची परवानगी मिळूनही दर्जाहीन काम
या भागातील रस्त्यांच्या कामांसाठी वनविभागाची परवानगी दीर्घकाळ प्रलंबित होती. आता परवानगी मिळाल्यानंतरही सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही दर्जाहीन काम होऊ नये, अशी कळकळीची मागणी बंदी भागातील जनतेने केली आहे.
लोकप्रतिनिधींवर दुर्लक्षाचा आरोप
स्थानिक आमदार व खासदार यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या भागाची पाहणी करून रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
आदिवासी व बंजारा समाजाचे हाल
बंदी भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी, बंजारा व इतर समाज वास्तव्यास असून, रस्त्याअभावी त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. आरोग्य, शिक्षण आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या कायम
शेतकऱ्यांचे फोडपट्टे अद्याप प्रलंबित असून, दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या समाधान शिबिरांचा अपेक्षित फायदा मिळत नसल्याची तक्रार शेतकरी व महिला वर्गाने केली आहे.
महिला उद्योग प्रकल्प रखडला
सन २०२१-२२ मध्ये मानव विकास मिशन अंतर्गत सोनदाभी येथे वनउपज प्रक्रिया उद्योग मंजूर करण्यात आला होता. इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी यंत्रसामग्री व इतर साहित्य खरेदीसाठी निधी अपुरा असल्याने प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. हा उद्योग सुरू झाल्यास स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
प्रशासनाला साद
“जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन बंदी भागातील रस्ते व उद्योग प्रकल्प मार्गी लावावेत,” अशी मागणी उपसरपंच मारोती पिलवंड यांनी केली आहे. तसेच, पत्रकारांनीही या भागातील समस्यांना वाचा फोडून शासनापर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



