Uncategorized

महागाव तालुक्यातील वागत इजारा येथे शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व नापिकीला बळी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वागत इजारा येथे सततची नापिकी, अतिवृष्टी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मनोहर नानू राठोड (वय ४५ वर्षे) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तात्काळ तलाठी व ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवून पंचनामा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
सततच्या नापिकीचा फटका
महागाव तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच वाढता कर्जबोजा आणि बँक तसेच खासगी सावकारांचा तगादा यामुळे अनेक कुटुंबे तणावाखाली असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न
तालुक्यात वारंवार शेतकरी आत्महत्या होत असतानाही अधिकारी, आमदार व खासदार पातळीवर ठोस प्रतिबंधात्मक नियोजन दिसून येत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष जनता दरबार घेऊन कर्जमाफी, पीकविमा, मदत व समुपदेशन याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी खासदार व आमदार जनता दरबार घेणार का? आणि आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा जाहीर केला जाणार का?
ही घटना तालुक्यासाठी मोठी शोकांतिका मानली जात असून, प्रशासनाने तात्काळ मदत व योग्य ती शासकीय मदत मृतकाच्या कुटुंबाला द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button