Uncategorized

काम न करताच १.६२ कोटींचे बिल उचलल्याचा आरोप; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कथित गैरव्यवहार उघड


महागाव प्रतिनिधीसंजय नागरगोजे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर झालेल्या एमडीआर-४२ तीवरंग ते मलकापूर रस्ता या कामामध्ये मोठ्या प्रमाणात कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काम प्रत्यक्षात पूर्ण झाले नसतानाही ते पूर्ण झाल्याचे दाखवून सुमारे १ कोटी ६२ लाख ४२ हजार रुपयांचे बिल उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
स्थळावर लावण्यात आलेल्या माहिती फलकानुसार या कामास १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला असून २१ ऑगस्ट २०२५ रोजी काम पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कामाचा ठेकेदार देशमुख ब्रदर्स इंजिनिअर्स अँड कंत्राटदार, पुसद असून कामाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत करण्यात आली आहे.
मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आजही संबंधित रस्ता पूर्ण झालेला नाही. असे असताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांचे बिल काढण्यात आल्याने अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासन निधीचा अपहार झाल्याचा आरोप होत आहे. माहिती फलक लागल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


विशेष म्हणजे, फलकावर पाच वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १६ लाख ७४ हजार रुपयांची तरतूद असल्याचेही नमूद आहे. प्रत्यक्ष कामच अपूर्ण असताना देखभालीच्या नावाखालीही निधी खर्च दाखविण्याची शक्यता असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच मतदारसंघाचे आमदार यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. एकतर एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शब्बीर यांनी लेखी तक्रार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button