Uncategorized

पोफाळी वनक्षेत्रात संरक्षित निलगायची अवैध शिकार; सागवान तोडीबाबतही संशय, वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड वनविभागाच्या अखत्यारीतील पोफाळी वनक्षेत्रात येणाऱ्या माळ आसोली शिवारात संरक्षित निलगायची बेकायदेशीर शिकार केल्याची धक्कादायक घटना ८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली, यामुळे पुसद उपविभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिकार केलेल्या निलगायचे मांसाचे वाटप सुरू असतानाच वनविभागाला याची माहिती मिळाली. माहिती मिळताच संबंधित वनाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करत निलगायचे मांस जप्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेबाबत वनविभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अत्यंत गुप्तता पाळण्यात येत असून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. मात्र प्राथमिक तपासात दोघांव्यतिरिक्त आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास अहवालानंतर निलगायची शिकार कशा प्रकारे व कोणत्या हत्याराने करण्यात आली, याबाबतचे सत्य समोर येणार असल्याचे संकेत आहेत.
या प्रकरणात आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून पुढील चौकशी एसीएफ दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ दत्ता पवार व पोफाळी क्षेत्राचे सहाय्यक वनाधिकारी चक्रधर जाधव करीत आहेत.
विशेष म्हणजे, या भागात मोठ्या प्रमाणावर सागवानाची अवैध तोड तसेच शिकारीचे वाढते प्रमाण असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अवैध शिकारी व सागवान तोडीवर कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button