अपूर्ण रस्त्याच्या कामावर १.६२ कोटींच्या अपहाराचा आरोप; चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील एमडीआर-४२ ते मलकापूर या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शब्बीर शेख भिक्कन यांनी मुख्यमंत्री, यवतमाळ जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित रस्त्याचे काम पूर्ण न करताच २०२६ मध्ये काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले. फलकावर काम सुरू होण्याची तारीख १३ फेब्रुवारी २०२४ व पूर्णत्वाची तारीख २१ ऑगस्ट २०२५ दर्शविण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी आरोप केला आहे की, ठेकेदार देशमुख ब्रदर्स इंजिनिअर्स, पुसद व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने ₹१,६२,४२,००० इतक्या शासकीय निधीचा अपहार करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन या आरोपांची कोणती दखल घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.



