Uncategorized

आमणी बु. येथे अवैध दारूविक्रीविरोधात रणरागिणींचा एल्गार सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात महागाव पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आमणी बु. येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारूविक्रीविरोधात गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महागाव पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली.
गावात खुलेआम सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप महिलांनी केला. गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याने महिलांचा संयम सुटला असून आता त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे.
महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आमणी बु. परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर देशी दारूची विक्री सुरू असून त्यामुळे भांडणे, कौटुंबिक वाद आणि गुन्हेगारी वाढत आहे. गावातील युवक शिक्षणापासून दूर जात असल्याची खंतही महिलांनी व्यक्त केली.
मोर्चादरम्यान महिलांनी “दारूमाफियांना आळा घाला”, “गाव दारूमुक्त करा” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. बीड जमादार यांच्या संगत मताने अवैध देशी दारूचा व्यवसाय सुरू झाल्याची समजते
महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे यांनी महिलांच्या निवेदनाची दखल घेत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तसेच गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या या एल्गारामुळे आमणी बु. परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात जनआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button