Uncategorized

आमदारांविरोधात शिवसेना आता मैदानात जलविद्युत प्रकल्पावरून आमने-सामने; प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, (ता.प्र.). सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या मुद्यावरून आता भाजप आमदार आणि शिवसेना (उबाठा) एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदारांनी विधिमंडळात मुद्दा मांडला. तर प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत बुधवारी (दि.२७) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवा सेना महिला आघाडी, विद्यार्थी सेनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. तालुक्यातील जनतेची व शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे मागणी नसताना आ. वानखेडे यांनी सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरु करण्याबद्दल विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे हा प्रकल्प परत सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. प्रकल्प झाल्यास उमरखेड तालुक्यातील मतखंडातील सुपीक जमिनी प्रकल्पामध्ये जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असून उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. उलट उद्योगपती, कंत्राटदारांचे सरकारमधील राजकीय पुढाऱ्यांचे हित साध्य होणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अॅड. बळीराम मुटकुळे, विधानसभा संघटक प्रशांत पत्तेवार, विधानसभा समन्वयक राजेश खामनेकर, तालुकाप्रमुख सतीश नाईक, तालुका संपर्कप्रमुख नीलेश जैन, माजी शहरप्रमुख तथा नगर परिषदेचे माजी सभापती संदीप ठाकरे, शहर संपर्कप्रमुख गजेंद्र ठाकरे, तानाजी शिंदे, अमोल नरवाडे, राजेश कवाने, नितीन शिंदे, सतीश पायगन, मुमताज खान, अर्जुन राठोड, विजय जाधव, गजानन शिंदे, अंकुश राठोड यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

        चौकट 

आमदारांचा निषेध
जलविद्युत प्रकल्प रद्द करून शेतकरी, शेतमजुरांचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने (उबाठा) दिला आहे. तसेच भाजप आ. किसन वानखेडे यांचा जाहीर निषेधही यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button