राजस्थानमध्ये प्रशिक्षण घेऊन मुळाव्यात उभारला अनोखा प्रयोग

- खेड्यातील कारागिराने दुचाकीचे केले ‘लोडिंग ट्रॉली’मध्ये रूपांतर
- स्वस्त, मजबूत व बहुउपयोगी ट्रॉलीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी
- सहसंपादक शेख मुजाहिद
मुळावा(वा):- उमरखेड तालुक्यातील मुळावा गावातील वेल्डर कारागीर विशाल भगवान पवार यांनी तांत्रिक कौशल्याच्या जोरावर दुचाकीचे लोडिंग ट्रॉलीमध्ये रूपांतर करून एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रयोग साकारला आहे. राजस्थानमध्ये विशेष प्रशिक्षण घेऊन परतलेल्या विशाल पवार यांनी जुन्या, निकामी दुचाकींचा उपयोग करून स्वस्त दरात मजबूत लोडिंग ट्रॉली तयार करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
या अनोख्या ट्रॉलीमध्ये ऑटोचे चाके, इंजिनला रिव्हर्स गिअर, तसेच हायड्रॉलिक पॉवर ट्राली बसवण्यात आली असून रिवर्स गियरमुळे कमी जागेतही वाहन सहज फिरवता येते . विशेष म्हणजे, ही ट्रॉली दहा क्विंटलपर्यंत वजन आरामात वाहून नेऊ शकते. ही क्षमता पाहता पारंपरिक दोन बैलगाड्यांइतके काम ही एकच ट्रॉली करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
जुन्या दुचाकींचे पुनर्वापर करून लोडिंग ट्रॉली बनवल्यामुळे खर्च कमी, देखभाल सुलभ आणि उपयोगिता अधिक असा त्रिसूत्री फायदा मिळतो. शेतीमाल वाहतूक, बांधकाम साहित्य, किराणा, चारा, लाकूड तसेच ग्रामस्तरावरील लघुउद्योगांसाठी ही ट्रॉली अत्यंत उपयुक्त ठरत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, लहान व्यापारी आणि बेरोजगार युवकांसाठी हे उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे.
या अभिनव प्रयोगामुळे परिसरात विशाल पवार यांचे सर्वत्र कौतुक होत असून, “ग्रामीण नवोन्मेषाचे जिवंत उदाहरण” म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कमी भांडवलात टिकाऊ, बहुउपयोगी आणि किफायतशीर वाहतूक साधन उपलब्ध करून देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतल्यास या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.



