कलगाव शिवारात खुलेआम पत्त्याचा क्लब? कॅनॉलजवळ जुगाराचा अड्डा; लाखोंची उलाढाल, परिसरात संशयास्पद गर्दी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कलगाव शिवारात खुलेआम पत्त्याचा क्लब सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. कॅनॉलजवळील जुन्या महादेव मंदिर परिसरात काही व्यक्तींनी जुगाराचा अड्डा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव येथील सोनार व समाधान नावाच्या व्यक्तींनी कलगाव शेत परिसरात पत्त्याचा क्लब सुरू केला असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी पत्ते खेळतानाचे दृश्य काही फोटोमध्ये दिसत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महागाव तसेच आंबड परिसरातील जुगार शौकीन मोठ्या संख्येने येथे येत असून दररोज मोठी गर्दी होत आहे. काही नागरिकांच्या मते, या क्लबमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचीही चर्चा आहे.
या ठिकाणी वाढलेल्या गर्दीमुळे परिसरात संशयास्पद हालचाली वाढल्याचे शेतकरी व नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची वर्दळ वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिकांनी तर या क्लबला कोणाचे पाठबळ आहे? असा सवालही उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि जर बेकायदेशीर प्रकार सुरू असेल तर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



