Uncategorized

सेनंद जंगलात वाघाची धुमाकूळ; गाईनंतर बैलाचीही शिकार नागरिकांत भीतीचे वातावरण, वनविभागाकडे नुकसानभरपाई व वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सेनंद जंगलामध्ये वाघाने गाईची शिकार केल्याची घटना गुरुवारी घडली, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या दोन दिवस आधी वाघाने एका बैलाचीही शिकार केली होती.
सततच्या शिकारीच्या घटनांमुळे सेनंद जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याचे स्पष्ट होत असून, दिवसेंदिवस वाघाकडून जनावरांवर हल्ले वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे जंगलालगतच्या गावांतील शेतकरी व पशुपालकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी महागाव वनविभाग कार्यालयात जाऊन वनपरिक्षेत्र अधिकारी मुनेश्वर साहेब यांना माहिती दिली. तसेच नुकसान झालेल्या जनावरांची तात्काळ नुकसानभरपाई द्यावी आणि वाघाचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी करणारे निवेदन वनविभागाकडे सादर करण्यात आले.
वाघाचा संचार वाढत असल्याने भविष्यात मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button