Uncategorized

ऊस टंचाई निर्माण केली तरच अपेक्षित दर मिळेल” – गोविंदराव देशमुख (सवनेकर)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
“ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवायचा असेल, तर कृत्रिम टंचाई निर्माण करणे अपरिहार्य आहे,” असे मत शेतकरी नेते गोविंदराव देशमुख (सवनेकर) यांनी व्यक्त केले. सवना-गुंज परिसरातील नॅचरल शुगर फॅक्टरी कडून गेट-केनला अधिक प्राधान्य दिल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभाच असल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ₹३३०० प्रतिटन दर दिला जात असताना संबंधित कारखान्याकडून ₹२७०० प्रतिटन दराने चेक अदा केल्याचा दावा देशमुख यांनी केला. यंदाच्या अतिवृष्टीमुळे हेक्टरी २०–२५ टनांनी उत्पादन घटले, त्यामुळे ऊस उत्पादक आधीच आर्थिक अडचणीत आहेत.
शासनाने गाळप हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू करण्याची अट घातल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरपूर्वीचा ऊस गाळपासाठी उत्पादकांना जवळपास १५ महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी कारखानदारांचे वर्चस्व असल्याने निर्णय कारखान्यांच्या सोयीचे घेतले जातात,” असा आरोपही त्यांनी केला.
मागील वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तोडणी-वाहतूक दरात ₹१३० प्रतिटन वाढ करण्यात आली; त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याचे देशमुख म्हणाले. राज्यात खाजगी व सहकारी असे दोनशेहून अधिक साखर कारखाने कार्यरत असताना ऊस उत्पादकांना दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
परिस्थिती बदलण्यासाठी ऊसाला पर्यायी पिकांकडे—मका, चिया सीड, हळद—वळण्याचे आवाहन करत, “अब्जावधींची गुंतवणूक असलेले कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात; पण ऊस उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडले जातात. अपेक्षित दरासाठी टंचाई निर्माण करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांना विशेष मदत जाहीर करावी व दरवाढीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button