हिवरा (संगम) येथे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा

महागाव प्रतिनिधी | संजय नागरगोजे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिवरा (संगम) येथे शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. माधवराव माने पाटील यांनी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना म्हटले की, “प्रभु श्रीराम यांच्यानंतर परस्त्रीला मातेसमान मानणारे आणि महिलेचा सर्वोच्च आदर करणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय होत.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज देशात महिलांवरील अत्याचारांची वाढती प्रकरणे चिंताजनक आहेत. अशा परिस्थितीत शिवरायांनी ज्या प्रकारे महिलांच्या सन्मानाचे रक्षण केले, परस्त्रीला मातेसमान मानले आणि अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली, ती शिकवण आजच्या सत्ताधाऱ्यांनी आणि समाजाने अंगीकारण्याची गरज आहे. तरुण पिढीने शिवचरित्रातील आदर्श आचरणात आणल्यास स्वराज्याचे ‘सुराज्य’ साकार होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नामदेवराव ससाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, ॲड. रमेश पाटील, ॲड. अनिल माने, माजी जि.प. सदस्य साहेबराव पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. स्मिताताई साहेबराव पाटील, सरपंच सौ. मेघाताई शिरीष बोरुळकर, उपसरपंच शरद पाटील, पोलिस पाटील प्रविण कदम, माजी सभापती ललिताबाई वसंतराव जामकर, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भारती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गावकरी, शिवभक्त आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
समितीचे परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजू गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश कामारकर यांनी मानले.
या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी छत्रपती शिवराय चौक समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव महेश कामारकर, कोषाध्यक्ष मुकुंद जामकर, सहसचिव प्रविण जामकर व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिवजयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमातून शिवरायांच्या विचारांचे पुनरुच्चारण करत महिलांच्या सन्मानाबाबत समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.



