बा.ना. सूतगिरणीच्या अध्यक्षासह संचालकांना धनादेश अनादर प्रकरणी नोटिसा

महागाव, प्रतिनिधी – संजय नागरगोजे
बा.ना. कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी पिंपळगाव (कान्हा) या संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाला धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सदर सूतगिरणी ही कृष्णा फायबर्स (जि. अकोला) यांना भागीदारी तत्त्वावर देण्यात आली होती. 31 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या करारानुसार व्याजापोटी ठेव म्हणून 50 लाख रुपये व करारांतर्गत 1 कोटी रुपये, अशी एकूण दीड कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. या रकमेसाठी प्रत्येक संचालकाकडून 10 लाख रुपयांचे सात धनादेश देण्यात आल्याची माहिती आहे.
यापैकी 10 लाख रुपयांचा एक धनादेश, जो Union Bank of India शाखा पुसद येथून 31 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आला होता, तो 29 जानेवारी 2026 रोजी State Bank of India शाखा अकोट येथे वटविण्यासाठी जमा करण्यात आला. मात्र खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने तो अनादरित (डिशॉनर) झाला.
यानंतर सूतगिरणीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांसह एकूण 20 संचालकांना 26 फेब्रुवारी 2026 रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या. प्रत्येकी 10 लाख रुपये 15 दिवसांच्या आत भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा Negotiable Instruments Act च्या कलम 138 अंतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचे अधिवक्ता R. B. Agrawal यांच्यामार्फत नोटिसा पाठवण्यात आल्याचे समजते. अध्यक्ष शामराव भाऊराव पाटील, व्यवस्थापकीय संचालक एम. आय. पात्री यांच्यासह अन्य संचालकांना ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर सूतगिरणीच्या संचालक मंडळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संबंधित संचालक मंडळाकडून या प्रकरणी अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून, पुढील कायदेशीर घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



