पोखरीत शेतकरी नेते मनीष जाधव यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवडीबद्दल विविध सहकारी सोसायटीचा गौरव

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
: महागाव तालुक्यातील पोखरी येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने शेतकरी नेते मनीष जाधव यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाल्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष हर्षवर्धन मनोहर मुनेश्वर यांनी मनीष जाधव यांच्या फेरनिवडीचे स्वागत करताना, “ही निवड केवळ एका व्यक्तीची निवड नसून कष्टकरी बळीराजाच्या आवाजाला मिळालेला सन्मान आहे. त्यांच्या कार्यामुळे पोखरी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, हा संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे मत व्यक्त केले.
‘शेतकऱ्यांनी एकीने संघर्ष करावा’
सत्काराला उत्तर देताना मनीष जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले. सध्याचा काळ शेतकऱ्यांसाठी कठीण असून, न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“राहू नका बेकीने, आता वागू एकीने. जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन शेतकरी हीच आपली एकजूट असली पाहिजे. शेतकरी संघटित झाल्याशिवाय निरपेक्ष न्याय मिळणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
“शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी लढणे ही माझी भूमिका राजकीय पक्षाच्या हंगामी नेत्यासारखी नसून ती माझ्या रक्तात भिनलेली आहे. शरीरात श्वास असेपर्यंत शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष करत राहणार,” असा निर्धारही जाधव यांनी व्यक्त केला.
पोखरीतील शेतकऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील लढ्यासाठी नवी ऊर्जा व बळ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सरपंच प्रवीण चव्हाण, सोसायटी अध्यक्ष हर्षवर्धन मुनेश्वर, प्रभूलाल जयस्वाल, रामेश्वर पाटील, पोलीस पाटील, रिपाइं गटाचे अध्यक्ष गौतम रणवीर, विशाल पवार, सुधीर देवानंद इंगोले, रमेश कान्हा मोहकर, सुधाकर रामचंद्र पवार, अमोल पांडोळे, अमित राठोड, प्रमोद जयस्वाल यांच्यासह सोसायटीचे संचालक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



