घर असणाऱ्यांना घरकुल, झोपडीत राहणारे मात्र वंचित; तीवरंग येथील लाभार्थ्यांचा संताप

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील तीवरंग येथे प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांच्या लाभ वितरणात अनियमितता झाल्याचा आरोप वंचित लाभार्थ्यांनी केला आहे. ज्या व्यक्तींकडे आधीपासून पक्की घरे आहेत, त्यांनाच घरकुलाचा लाभ देण्यात आला असून, प्रत्यक्षात घर नसलेल्या व झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरजू कुटुंबांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाविरोधात संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुक व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवून आपली व्यथा मांडली आहे. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ कोणत्या निकषांवर देण्यात आला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी वंचित लाभार्थ्यांकडून होत आहे.
घरकुलासाठी खरोखर पात्र असलेल्या अनेक कुटुंबांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “ज्यांना स्वतःचे घर नाही आणि जे आजही झोपड्यांमध्ये राहतात, त्यांनाच शासनाच्या योजनांचा प्राधान्याने लाभ मिळणे अपेक्षित असताना त्यांना डावलण्यात आले,” असा आरोप नागरिकांनी केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची निवड करताना कोणते निकष लावले, पात्रता यादी कशी तयार करण्यात आली आणि अपात्र व्यक्तींना लाभ कसा मिळाला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक वंचित कुटुंबांना न्याय मिळेल आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या गरजूंना मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



