Uncategorized

ठाणेदाराकडून फिर्यादीलाच मारहाण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, कुटुंबीयांसमोरच पट्ट्याने मारहाण

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, दि.१३ः तालुक्यातील पोफाळी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय युवकालाच ठाणेदाराने अमानुषपणे मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक तक्रार पीडित तरुणाने यवतमाळच्या पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. याप्रकरणी पोफाळीचे ठाणेदार पंकज दाभाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे. मात्र, फिर्यादीने केलेली तक्रार खोटी असल्याची प्रतिक्रिया ठाणेदार दाभाडे यांनी दिली आहे.

तक्रारकर्ते शंकर आनंदराव सरकाळे (वय २४, रा. पोफाळी कारखाना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची हिवरा येथील बहीण शारदा विलास तायडे ही माहेरी आली होती. तिचा शेजारील महिलेशी वाद झाला. त्या महिलेने इतर तिघांना सोबत घेऊन ९ जून रोजी घरी येऊन धिंगाणा घातला. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी शंकरचे कुटुंबीय पोफाळी पोलिस ठाण्यात गेले. शंकर तेथे पोहोचल्यावर त्याने ठाणेदारांना मोबाईल फोनची शहानिशा करण्यास सांगितले. यावर, ठाणेदार पंकज दाभाडे यांनी शंकरला त्याच्या आई-वडील व बहिणीसमोरच पट्ट्याने मारहाण केली. यात त्याच्या कानाला व गालाला जखम झाली. त्याला खाली पाडून, गळ्यावर बुटासह पाय देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबीयांनी हातपाय पडून त्याला वाचवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी पोलिस स्टेशनमध्येच दुपारच्या सुमारास घडली. तसेच, शंकरचे वडील आनंदराव सरकाळे यांनाही शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याउलट, ठाणेदार पंकज दाभाडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, तक्रार खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे. शंकर सरकाळे यांनी, आपल्या तक्रारीची सात दिवसांत दखल न घेतल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारादि दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!