Uncategorized

तोरणमाळच्या अतिदुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी झाली गोड


शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192


तोरणमाळच्या अतिदुर्गम भागातील वंचित आदिवासी बंधू भगिनींची दिवाळी भोसरीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांच्यामुळे गोड झाली. गेली २००७ सालापासून नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील डोंगर द-यातील आदिवासी पाड्यावर जाऊन कधी दिवाळी फराळ तर कधी फराळ व कपड्यांचे वाटप करून आदिवासी बंधू भगिनींच्या समवेत संदीप राक्षे दिवाळी साजरी करीत असतात.. अशा या सामाजिक उपक्रमाला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्षी पण २९ व ३० ऑक्टोबर २०२४ रोजी तोरणमाळच्या कड्या कपारीतून चालत अतिदुर्गम अशा आदिवासी पाड्यावर जाऊन स्वखर्चाने महिला भगिनींच्यासाठी नवीन साडी व दिवाळी फराळाचे वाटप केले यावर्षी मदतीला होते सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ..

वंचितांच्या चेहऱ्यावर
फुलवून आनंद निराळा!
मन सुखावते पाहून
सुरू होतो दीप सोहळा!!

व्यक्तिगत दु:ख बाजूला ठेवून सण साजरे करण्याची आपली परंपरा आहे. प्रसंगी ऋण काढून आपण सण साजरे करीत असतो, कारण यानिमित्ताने कुटुंबातील, समाजातील प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद हा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा प्रेरणा देणारा असतो. शहरी भागात घराघरांवर आकाशदीप उजळलेले दिसतात. सारे वातावरण व आसमंतच एका अनोख्या चैतन्याने व मांगल्याने भारलेले असते, चैतन्याचे, उत्साहाचे व आनंदाचे हे तरंग सर्वव्यापीपणे अनुभवास येताना दिसतात. आपण सारे आपल्या परिवारातच आनंदी असतो. आपल्या पलीकडे काय चालले आहे, इतरांची किती विदारक परिस्थिती आहे याचे भानच नसते. इतर आपलेच बंधू किती भयानक अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला शिवत नसतो. दिवाळीचा सण व त्यानिमित्तचा आनंद साजरा करताना, आपल्या

पलीकडल्यांकडे लक्ष देण्याची किंवा त्यांचा विचार करण्याची खरी गरज आहे. आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या वंचित, उपेक्षितांबरोबरच आदिवासी वाड्या पाड्यांवरील अनेक बांधव अजूनही मूळ प्रवाहात येऊ शकलेले नाहीत. शहरी भागात आपण दिवाळीच्या फराळाची स्पर्धा करतो; परंतु तिकडे नियमित व आवश्यक त्या जेवणाचीच मारामार असल्याने कुपोषणासारखा विषय सुटू शकलेला नाही. सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांच सारखच प्रत्येकाने आदिवासी भागात जायला हवे. आपल्याला जे शक्य ते द्यायला हव. आदिवासी चेह-यावर साकारणारा आनंद हा किती अनमोल वा अवर्णनीय असतो याचा अनुभव घ्यायला हवा. सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांचे कार्य अवर्णनीय आहे त्यांच्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!